आमची यशोगाथा
ग्रामपंचायत बोकटे, येवला – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र
नाशिक-येवला राज्य मार्गाच्या गडद रेषेपासून थोडं पूर्वेकडे वळलं, की तिथं साक्षात निसर्गाचं एक अव्यक्त सुंदर रुप भेटतं ,बोकटे सुमारे २२२५ लोकवस्तीचं हे गाव कोळगंगा नदीच्या काठावर निवांतपणे विसावलेलं आहे. गावाचं स्वरूप लहान, पण त्याची ओळख मोठी इथली माणसं, संस्कृती, निसर्ग, सृष्टी आणि श्रम यांचं एक अनोखं संमीलन इथे दिसतं.
धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख
बोकटे गावाची एक खासियत म्हणजे एकच ग्रामदैवताचं कालभैरवनाथ मंदिर. इथे दोनच मोठे समाज आदिवासी आणि मराठा, पण दोघेही गुण्यागोविंदानं, आपुलकीनं, एका छताखाली नांदतात. गावात वादाच्या नाही, तर एकोप्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात.उत्पन्नाचे स्रोत: श्रमशीलतेचं गाव
गावकऱ्यांची मुख्य जीवनरेखा म्हणजे शेती आणि मोलमजुरी.
गावाचा पूर्व भाग म्हणजे एक बागायती शेताचं स्वप्न,वाघाड कालव्य मुळे इथे शेती भरभराटीला आली आहे. कांदा, मका, सोयाबीन, भाजीपाला, वेलवर्गीय पिकं, यासारख्या पिकांची हिरवळ नजरेत भरते. ही नवी दिशा गावाच्या भविष्याला नवी पहाट देणारी आहे.